About us
'मराठी कट्टा'वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे!
तुमची मराठी भाषा कशीही असो, तुम्हाला अस्सल मराठीत गप्पा मारायची इच्छा आहे का? तर मग हे हक्काचे व्यासपीठ फक्त तुमच्यासाठीच आहे.
आपला उद्देश आणि हा कट्टा का?
मी एक महाराष्ट्रीय आहे आणि मला माझ्या भाषेचा अभिमान आहे! शिक्षणाच्या आणि नोकरीच्या निमित्ताने मला महाराष्ट्रातील विविध संस्कृती आणि भाषेच्या गोड छटा अनुभवता आल्या. अमरावती-नागपूर-गोंदिया-गडचिरोलीकडची भाषा असो, सातारा-कराड-कोल्हापूरची भाषा असो, किंवा पुणे अथवा मुंबईची मराठी असो... प्रत्येक भाषेची एक वेगळीच मजा आहे.
पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते... आजकाल आपल्या रोजच्या संवादात इंग्रजी शब्दांची खूप गर्दी झाली आहे आणि आपण अगदी सहजतेने इंग्रजी शब्द मराठीत वापरतो. म्हणूनच, ज्यांना आपली मराठी १००% शुद्ध स्वरूपात बोलायची आहे, किंवा ज्यांना ही भाषा नव्याने शिकायची आहे, त्यांना तसे हक्काचे आणि मोकळे वातावरण देण्यासाठी या 'मराठी कट्ट्या'ची सुरुवात केली आहे.
कट्ट्याचे खास नियम आणि वैशिष्ट्ये:
इंग्रजीला फाटा, केवळ मराठी: या कट्ट्यावर आपण केवळ आणि केवळ मराठीतच संवाद साधणार आहोत. रोजच्या बोलण्यातील इंग्रजी शब्दांचा वापर आपण जाणीवपूर्वक आणि हसत-खेळत टाळणार आहोत. इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधण्यासाठी तुम्ही शब्दकोश वापरू शकता.
नवशिक्यांपासून ते जाणकारांपर्यंत सर्वांचे स्वागत: तुम्ही नव्याने मराठी शिकत असा, किंवा अस्सल मराठीत मनमोकळ्या गप्पा मारण्याची तुमची इच्छा असो... इथे सर्वांसाठी एक मोकळे आणि उत्साहवर्धक वातावरण असेल.
संवादाची कला: कथा, अनुभव आणि विविध विषयांवर चर्चा करून आपण आपला आत्मविश्वास आणि भाषेवरील प्रभुत्व वाढवणार आहोत.
आभासी बैठकीमध्ये आपण चर्चेसाठी विविध विषय ठेवू. सुरुवातीला आपण आंतरजालाच्या माध्यमातून भेटू आणि चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर नक्कीच त्याचे 'प्रत्यक्ष कट्ट्या'त रूपांतर करू.
💻 पहिली पायरी (आभासी कट्टा): सुरुवातीला आपण आंतरजालाच्या माध्यमातून भेटू. एकमेकांची ओळख करून घेऊ आणि गप्पांची सुरुवात करू.
☕ दुसरी पायरी (प्रत्यक्ष कट्टा): आपल्या आभासी भेटींना चांगला प्रतिसाद मिळाला की, आपण एखाद्या छानशा सभागृहात किंवा शांत ठिकाणी प्रत्यक्ष भेटून मनमोकळ्या गप्पा मारू.
चला तर मग, आपल्या भाषेचा हा अनोखा प्रयोग यशस्वी करण्यासाठी नक्की वेळ काढा आणि आजच सहभागी व्हा. कारण आपल्या माणसांसोबत आपल्या भाषेत बोलण्याची मजा काही औरच असते!
भेटूया लवकरच!
Upcoming events
1

